नाशिक : वसंतदादा सहकारी साखर कारखाना (वसाका) हा या भागातील प्रमुख उत्पादक केंद्र मानला जातो. मात्र, विठेवाडी येथील वसाकाची चाके यंदा पुन्हा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कराराने दिलेल्या धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थापनाने विविध कारणे देत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
धाराशिव कारखान्याच्यावतीने याबाबत कामगारांना तशी नोटीस पाठवली. मात्र याबाबत कामगारांना काहीच माहिती नाही. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कळवण, देवळा, बागलाण, मालेगाव आणि चांदवड अशा तालुक्यांतील २८९ गावे येतात. मध्यंतरी कारखाना कर्जाच्या विळख्यात गेला. २०१३ पासून सलग तीन वर्षे कारखाना बंद राहिला. युतीच्या सरकारच्या काळात, २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर डॉ. राहुल आहेर यांनी कारखाना सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला. कारखाना व्यवस्थापनाने २०१५-१६ मध्ये शिखर बँकेबरोबर करार केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गाळपास सुरुवात झाली. २०१७-१८ मध्ये चार महिने कारखाना सुरू राहिला. पण कामगार व व्यवस्थापनातील वादाने बंद पडला. २०१८-१९ मध्ये धाराशिव उद्योग समूहाने कारखाना चालविण्यास घेतला. त्यावेळी कामगार संघटना, राज्य बँक आणि व्यवस्थापनात त्रिसदस्यीय करार झाला. परंतु आता तीन वर्षांनंतर, २९ ऑगस्ट २०२३ ला धाराशिव व्यवस्थापनाने काही कारणे देत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कसमादे परिसरात ऊस लागवड घटली आहे.