सोलापूर : यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अधिकचा ऊस मिळवण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये दराची स्पर्धा सुरू झाली आहे. जास्त ऊस मिळवण्यासाठी साखर कारखाने बक्षीस जाहीर करीत आहेत. गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर केली आहे. अशा प्रकारची बक्षीस योजना जाहीर करणारा हा जिल्ह्यातील पहिला ठरला आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी २५०० रुपयांच्या आसपास दर जाहीर केला आहे. टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने २५०० रुपये दर जाहीर करून ऊस दराची कोंडी फोडली आहे. त्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक २५५० रुपये दर जाहीर केला आहे. दरवर्षी उच्चांकी दर देणाऱ्या श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने अद्याप दराची घोषणा केलेली नाही. यंदा कारखान्यांचा गाळप हंगाम जेमतेम १०० दिवस चालेल असा अंदाज आहे. त्यामुळे चांगला ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांची धावपळ करावी लागणार आहे.
विठ्ठल कारखान्याने शंभर टन ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती टन १० रुपये, अडीचशे टनासाठी १५ रुपये, पाचशे टनासाठी २५ रुपये तर एक हजार टनासाठी ५० रुपये बक्षीस म्हणून अधिकचे देण्यात येणार आहेत. कारखान्याने जाहीर केलेल्या बक्षीस योजनेचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले की, या बक्षीस योजनेमुळे कारखान्याला चांगला साखर उतारा मिळणारा ऊस मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बक्षीस योजनेचा कारखान्याला ऊस मिळवण्यासाठी चांगला फायदा होईल.