सातारा : आव्हानात्मक परिस्थितीत किसन वीर खंडाळा सहकारी साखर कारखान्याने गेल्यावर्षीचा हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला आहे. कोणाचेही एक रुपयाही देणे ठेवले नाही. यावर्षीच्या हंगामाचीही पूर्ण तयारी कारखाना प्रशासनाने केली आहे. आता शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्याला घालावा. चांगला ऊस असेल तर चांगला दर देण्याची जबाबदारी माझी राहील, असे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी केले. किसन वीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते गळीत हंगामाला प्रारंभ करण्यात आला. खंडाळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, किसन वीरचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, दत्तानाना ढमाळ, नितीन भरगुडे-पाटील, सुभाषराव साळुंखे, सुनील शेळके, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आदी उपस्थित होते.
आमदार मकरंद पाटील म्हणाले की, आम्ही नेहमीच विकासाचे काम केले आहे. दोन्ही कारखाने सुरू होण्यासाठी अजितदादांनी शब्द दिला होता म्हणून हा निर्णय घेतला. आता राज्य शासनाच्या माध्यमातून या कारखान्याला मदत होणार आहे. यावेळी व्ही. जी. पवार म्हणाले की, कर्जाच्या ओझ्याखालील कारखाना सुरू करण्यासाठी आबांनी पुढाकार घेतला. त्यामुळेच आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. यावेळी नितीन गुडे-पाटील यांचे भाषण झाले. राजेंद्र तांबे यांनी स्वागत केले.