पुणे : राज्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना आता उसाला सर्वाधिक दर देणारा सहकारी साखर कारखाना ठरला आहे. कारखान्याने २०२२-२३ या हंगामात ३४११ रुपये ऊस दर जाहीर केला आहे. आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ३६० रुपये प्रती टन जमा केले जाणार आहेत. कारखान्याने यापूर्वी शेतकऱ्यांना २९५१ रुपये अदा केले आहेत. तर डिस्टिलरी विस्तारीकरणासाठी प्रती टन १०० रुपये राखीव ठेवण्याचा निर्णय आधीच जाहीर करण्यात आला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने कामगारांना २१ टक्के बोनस देण्याचे जाहीर केला आहे. दिवाळीवेळी यापैकी १६ टक्के बोनस मिळेल. तर जानेवारी महिन्यात, मकर संक्रांतीवेळी उर्वरित ५ टक्के बोनस दिला जाणार आहे. कारखान्याच्यावतीने रोजंदारीवरील कामगारांनासुद्धा दिवाळीसाठी ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. कारखान्याने गेटकेनधारकांना या अगोदर २८५१ रुपये दिले असून उर्वरित २४९ रुपये मिळणार आहेत अशी माहिती देण्यात आली. यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. केशवराव जगताप, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी देवकाते व कार्यकारी संचालक अशोक पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.