इथेनॉलमुळे साखर कारखान्यांच्या मळीच्या दरात पाच वर्षांत तिप्पट वाढ

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत मळीच्या दरात तिप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत स्पिरिट, इथेनॉलला मागणी वाढल्याने कारखान्यांकडील मळीला सरासरी १० ते १४ हजार टन असा दर मिळत आहे. ‘बी’ दर्जाच्या मळीपासून इथेनॉल उत्पादन घेतले जाऊ लागले. इथेनॉलची तातडीने विक्री होते. त्याला दरही चांगला मिळतो. त्यामुळे कारखानदार आता मळी वाया जाणार नाही, याकडे लक्ष देत आहेत.

सात वर्षांपूर्वी कारखान्यातून बाहेर पडलेल्या मळीपासून स्पिरिट तयार करणे हा एकमेव पर्याय होता. पण स्पिरिटलाही फारशी मागणी नव्हती, दर कमी होता. त्यामुळे अनेक कारखान्यांची मळी विक्री होत नसे. त्यामुळे कारखान्यांची मळी नदीत सोडली जायची. त्याबाबत तक्रारी वाढल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली जात होती.

सद्यस्थितीत मळीपासून उपपदार्थ तयार होऊ लागल्याने प्रदूषण रोखण्यास मदत होत आहे. साखर कारखान्यांतून प्रती टन ४ टक्के मळी मिलते. ऊस गाळपाच्या क्षमतेनुसार कारखान्यांत हंगामाला २४ ते ३० हजार टन मळीचे उत्पादन होते. सहा वर्षांपूर्वी मळीचा दर ४००० रुपये टन होता. आता हा दर १०,००० रुपये टन झाला आहे. बी हेवी मळी इथेनॉल उत्पादनासाठी उपयुक्त आहे. त्याचा दर १२ ते १४ हजार रुपये टन आहे. मळी विक्रीतून कारखान्यांना हंगामात १० ते १२ कोटी रुपये मिळतात अशी स्थिती आहे. काही कारखान्यांनी यापेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here