पोलिसांनी कर्नाटकातील ऊस महाराष्ट्रात आणण्याचा ठेका घेतलाय का ?: राजू शेट्टींचा सवाल

कोल्हापूर : कर्नाटकातील ऊस बंदोबस्तात महाराष्ट्रात आणणारे हुपरी पोलीस जवाहर साखर कारखान्यावर इतके का मेहरबान झालेत ? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांची परवानगी नसताना बेकायदेशीररित्या हुपरी पोलिसांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. त्याबाबतची तक्रार राजू शेट्टी यांनी जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे फोनवरून केल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.

जवाहर साखर कारखान्यासाठी ऊस आणण्यासाठी हुपरी पोलिस बंदोबस्तातील गाडी घेऊन कर्नाटक राज्यातील मांगनूर या ठिकाणी गेले असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समोर आणला आहे. त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पोलिसांना राज्याबाहेर जाण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांची परवानगी घ्यावी लागते. ज्या राज्यात गेलेत तेथील स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन कारवाई करावी लागते. मात्र, हुपरी पोलिस राजरोसपणे कर्नाटक हद्दीत जातात. त्या ठिकाणाहून पोलिस बंदोबस्तात उसाची वाहने जवाहर कारखान्यास आणतात. हे बेकायदेशीर असून, पोलिसांनी कारखान्याचा ठेका घेतल्याचे काम सुरू केलेले आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here