सोलापूर : चांदापुरी (ता. माळशिरस) येथील ओंकार साखर कारखाना गळीत हंगाम २०२३ २४ चा शुभारंभ शेतकरी महिलांच्या हस्ते करण्यात आला. कारखाना यंदाच्या ऊस गाळीत हंगामात पहिला हप्ता प्रति टन २७०० इतका देणार असल्याची घोषणा ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे- पाटील यांनी केली. कारखान्याचा गळीत हंगाम ऊस उत्पादक महिलांच्या हस्ते मोळी पूजन करून करण्यात आला. यामध्ये संचालिक रेखाताई बोत्रे- पाटील, सीमा नष्टे, मंगल गायकवाड, सिंधुबाई पांढरे, कोमल कोपनर, सुवर्णा केचे, पुनम गोरे, शितल जाधव, शारदा कोपनर, सुमन अर्जुन, कोमल पवार, मनिषा करे यांचा समावेश होता.
चेअरमन बाबुराव बोत्रे- पाटील म्हणाले, कारखान्याने यंदा ७ लाख मेट्रीक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याचा वजन काटा चांगल्या दर्जाचा आहे. दुसरीकडे ऊस वजन करुन खात्री करा. कारखान्याचे कोजन इथेनॉल डिस्टिलरी या उपपदार्थ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून १५ डिसेंबर दरम्यान उद्घाटन होणार आहे. कपोस्ट खतही सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील, प्रशांत बोत्रे-पाटील, जनरल मॅनेजर भीमराव वाघमोडे, सरपंच जयवंतराव सूळ माजी सरपंच भजनदास चोरमले, अशोक भोंगाळे, भगवानराव सुळ, रामचंद्र मगर, कारखान्याचे अधिकारी पी. डी. पाटील, तानाजी देवकते, अमोल तरंगे, प्रविण पिसे, शरद देवकर, विष्णु गोरे, धन्यकुमार जमदाडे, गणेश धाईगुडे आदी अधिकारी उपस्थित होते. प्रस्ताविक शेतकी अधिकारी विष्णू गोरे यांनी केले.