राज्यात तणावपूर्ण वातावरणात गळीत हंगाम सुरू

कोल्हापूर : गेल्या हंगामातील ४०० रुपये आणि यंदाच्या ऊस दराच्या मुद्यांसाठी शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या सावटाखाली राज्यात बुधवारपासून गळीत हंगामास सुरुवात झाली. या भागातील साखर कारखान्यांनी सावधगिरी बाळगत ऊस तोडणी सुरू केली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत तणावग्रस्त स्थिती आहे. त्यामुळे अनेक कारखान्यांनी पोलिस बदोबस्तात ऊस वाहतूक करण्याचे नियोजन केले आहे. तर प्रशासनाने यातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसास टनास चारशे रुपये मिळावेत या मागणीसाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ‘स्वाभिमानी’सह इतर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी गुरुवारी (ता. २) कारखानदार व शेतकरी संघटना यांच्या बैठक घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. पावसाने दडी मारल्याने ऊस तुटवड्याची स्थिती आहे. त्यामुळे १ नोव्‍हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय झाला. सद्यस्थितीत हंगाम दिवाळीपर्यंत धीम्या प्रमाणात सुरू राहण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर मजूर आल्यानंतर हंगामाला गती येईल. यंदा मराठवाडा, नगर सोलापूर जिल्ह्यात यंदा उसाची वाढ घटली आहे. ऊस पट्ट्यातही उसाचा तुटवडा आहे. अनेक कारखानदारांनी सावधगिरी बाळगत ऊस तोडणी सुरू केली होती. कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांनी ऊस तोडणीसाठी मजूर पाठविले. मात्र अनेक गावांत ऊसतोडणी सुरू झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here