पुणे : विघ्नहर साखर कारखान्याने गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसापोटी आत्तापर्यंत प्रती टन २,७५० रुपयांप्रमाणे पैसे ऊस उत्पादकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केले आहेत. आता उर्वरित प्रती टन ३०० रुपये शुक्रवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. यंदा शेतकऱ्यांना विना कपात ३,०५० रुपये अंतिम भाव देण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.
निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ बुधवारी (ता. १) येथे साध्या पद्धतीने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मराठा आंदोलनाला पाठिंबा देत अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप आणि सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकली. कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक, सकल मराठा समाज समन्वयक आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, सभासद ऊस उत्पादक, अधिकारी व कामगार उपस्थित होते.
शेरकर यांनी सांगितले की, यंदा गाळप हंगाम २०२३-२४ साठी सुमारे १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. कमी कालावधीत जास्त ऊस गाळप होईल. साखरेचे व इथेनॉलचे दर पुढील वर्षीही चांगले राहण्याची शक्यता आहे. इतर शेतीमालाचे अनिश्चित असलेले बाजारभाव लक्षात घेता उसाला हक्काचा बाजारभाव मिळतो. तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उसाची लागवड करावी. साखर कारखान्याच्या कामगारांना १५ टक्के बोनस, फरकाची रक्कम व इतर देणी दीपावलीपूर्वी अदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी स्वागत केले. अरुण थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार मानले.