मुंबई : खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या आयातीसाठी खर्च होणारे परकीय चलन हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा भार ठरत आहे. खनिज तेलाला सद्यस्थितीत ९३ डॉलर्स प्रती बॅरल दर आहे. आगामी तीन वर्षात हा दर प्रती बॅरल १५० डॉलर्स एवढा वाढण्याची शक्यता असल्याचे जे. पी. मॉर्गन संस्थेने म्हटले आहे. त्यामुळे खनिज तेलाची आयात घटविण्यासाठी इथेनॉल उत्पादनावर भर दिला जात आहे. यातही किफायती इथेनॉल उत्पादनासाठी ज्वारीचा पर्याय सुचवला जात आहे.
लोकसत्तामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरकारने खनिज तेलाची आयात कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत १२ टक्के इथेनॉल मिश्रण केले जाते. हे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा पर्यावरणपूरक इंधन आहे. सद्यस्थितीत भारतात पुरेशा प्रमाणात व कमी किमतीत इथेनॉलचे उत्पादन होत नाही. या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीही केली जाते. हे इथेनॉल पेट्रोलचे इंधन वितरण कंपन्या सुमारे ६५ रुपये लिटर दराने खरेदी करतात. तांदळापासूनही इथेनॉल निर्मिती केली जात आहे.
दरम्यान तज्ज्ञांच्या मते, थेट उसापासून वा तांदळापासून इथेनॉल निर्मिती करण्याऐवजी ते गोड ज्वारीपासून निर्माण केले तर ते सहज ३५ रुपये लिटर दराने उपलब्ध होईल. उसाच्या पिकासाठी हेक्टरी ३३ हजार घनमीटर पाणी लागते. गोड ज्वारीच्या पिकासाठी पाण्याची गरज चार हजार घनमीटर एवढी मर्यादित आहे. या पिकामुळे भाकरी करण्यासाठी ज्वारी मिळेल. पिकाच्या दांड्यातील गोड रसापासून इथेनॉल तयार करता येईल आणि शिल्लक राहिलेला चोथा पशूखाद्य म्हणून वापरता येईल. रमेश चंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी याविषयीचे संशोधन केले आहे. गोड ज्वारीपासून इथेनॉलची निर्मिती करण्याचे काम ब्राझील व चीन या देशांमध्ये सुरू आहे. हे पीक शीत कटिबंधात येत नाही. भारताचे हवामान या पिकासाठी पोषक आहे. त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.