सरकारच्या अयोग्य धोरणांमुळे साखर हंगामात अडथळे : आमदार अरुण लाड

सांगली : उसाला अजूनही दर देणे शक्य आहे, पण शासकीय स्तरावर साखरेची किंमत ३१०० वरून ३८०० रुपये करणे गरजेचे आहे. याशिवाय, नैसर्गिक बदलांमुळे तसेच शेती, साखर कारखानदारीबाबतच्या आडमुठ्या धोरणांमुळे गळीत हंगाम आव्हानात्मक ठरणार आहे, असे मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले. क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या २२ व्या गाळप हंगामाच्या प्रारंभी आमदार लाड बोलत होते.

यावेळी क्रांतिअग्रणी बापू व विजयाकाकू लाड यांच्‍या प्रतिमेचे पूजन झाले. ऊस उत्पादक सभासदांच्या हस्ते काटा पूजन व गव्हाणीत उसाची मोळी टाकून हंगाम प्रारंभ झाला. अध्यक्ष शरद लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड प्रमुख उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष शरदलाड म्हणाले की, यावर्षी १४ लाख टन ऊस उपलब्ध आहे. १० लाख टन गाळपाचे उद्दिष्‍ट आहे. गळीत १६०-१८० दिवस हंगाम होणे गरजेचे असताना यंदा १२० दिवसच होईल. त्यामुळे ते कारखान्यांसाठी अडचणीचे ठरणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अडचणीत मदत करणाऱ्या कारखान्यांना ऊस गाळपासाठी पाठवा. आमचा कारखाना सर्व देणी वेळेत दिल्याने अल्पावधीत सर्वांच्या विश्वासास पात्र ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here