कोल्हापूर : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. कारखाना सभासद केंद्रस्थानी मानून व्यवस्थापन या हंगामासाठी एकरकमी ३००१ रुपये देणार असून, तद्नंतर हंगाम समाप्तीनंतर हिशेबाअंती शासनाच्या आरएसएफ धोरणानुसार होणारी उसाची किंमत आदा करणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी केले. कारखान्याच्या ५२ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन पाटील यांच्या हस्ते झाला.
साखर कारखान्याचे सर्व संचालक व मान्यवरांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यंदा कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप प्रक्रिया करणार आहे असे ते म्हणाले. चेअरमन पाटील म्हणाले की, सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जाईल. चालू हंगामात १२ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, सर्व सभासदांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे. कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे यांनी आभार मानले. व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक अनिल कुमार यादव, विनया घोरपडे, यशोदा कोळी, संगीता पाटील, बाबासो पाटील, शरदचंद्र पाठक, रघुनाथ पाटील, विश्वनाथ माने आदी उपस्थित होते.