सातारा : येथील किसन वीर साखर कारखाना आणि खंडाळा येथील किसन वीर- खंडाळा साखर कारखान्यातर्फे यंदाच्या गळीत हंगामात ऊसाला प्रती टन २८०० रुपये पहिला हप्ता दिला जाईल अशी माहिती किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी दिली. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी एफआरपीनुसार जो अंतिम दर निघेल तो देणार आहे, असे स्पष्ट केले. कार्यक्षेत्रातील सभासदांनी विश्वास दाखवल्यानेच दोन्ही साखर कारखाने सुरू ठेवण्यात यशस्वी ठरलो असे त्यांनी म्हटले आहे.
चेअरमन आमदार मकरंद आबा पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांच्यासह दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने प्रसिद्धी पत्रकातून ऊस उत्पादक सभासदांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता संपूर्ण ऊस हा किसन वीर, किसन वीर- खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहन केले आहे. गेल्यावर्षीच्या गळीत हंगामात किसन वीरची प्रती टन २६५० प्रमाणे होणारी रक्कम १२२ कोटी ४ लाख ४८ हजार २८१ रुपये व किसन वीर- खंडाळ्याची प्रती टन २५०० प्रमाणे ३३ कोटी ६० लाख २९ हजार ४५४ रुपये एफआरपीची सभासदांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे, असे स्पष्ट केले आहे.
साखर कारखान्याच्या गाळप हंगाम प्रारंभी दिवाळीनिमित्त ५० रुपयांचा हप्ता जाहीर केलेला असून त्याची होणारी २ कोटी ३० लाख २७ हजार ६६७ रुपयांची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहोत. कोणत्याही बँकेचा एक रुपयाही न घेता किसन वीरसाठी २७०० रूपये, खंडाळ्यासाठी २५०० रुपयांचा दर देण्यात यशस्वी झालो आहोत. दोन्ही कारखाने प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढतील. जी अंतिम एफआरपी निघेल, त्याप्रमाणे दर दिला जाईल, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.