जळगाव : संत मुक्ताई साखर कारखान्याचा १० वा गळीत हंगाम व मोळीपूजन शुभारंभ कारखान्याचे जनरल मॅनेजर अमृत देवरे त्यांच्या पत्नी मंगल देवरे यांच्या हस्ते झाला. यावेळी पंचायत समीतीचे माजी सभापती विलास धायडे व त्यांच्या पत्नी मिनाक्षी धायडे यांचे शुभ हस्ते बॉयलर पुजन करण्यात आले.अमृत देवरे म्हणाले कि, मागील १० वर्षां पासून साखर कारखान्याने सर्व गळीत हंगाम यशस्वी करून ऊसाला चांगला भाव दिला आहे. चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी येत्या हंगामात प्रति टन २४०० रुपये दर देण्यात येईल, असे परीपत्रकाद्वारे जाहिर केले आहे. तसेच साखरेला वाढीव दर मिळाल्यास एफ. आर.पी. पेक्षा जास्त ऊसदर देण्याचा प्रयत्न राहील असेही जाधव यांनी कळविले आहे.
चालू हंगामात मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आणला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक अजय जाधव यांनी केले आहे. याप्रसंगी घोडसगांव येथील प्रगतशिल शेतकरी विलास घावडे, रविंद्र महाजन,सोपान मोरे, मुख्य शेतकी अधिकारी मुकेश भामरे, चिफ केमिस्ट मधुकर कचवे, ई.डी.पी. मॅनेजर रविकुमार भोसले, ऊस विकास अधिकारी सुरेश देवरे, गिरीधारी नाईकवाडे, पंकज पाटील, संतोष वंजारी, हणमंत कांगणे, समाधान सपकाळ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.