सांगली : ‘दालमिया’ कारखान्याचा उच्चांकी ऊसतोडणी-वाहतूक खर्च

सांगली : राज्यातील सर्व साखर कारखान्यांचा गेल्या हंगामासाठीचा ऊस तोडणी व वाहतूक खर्च जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यात दालमिया शुगर्सचा ऊसतोडणी-वाहतूक खर्च उच्चांकी ९०५.७१ रुपये प्रती टन तर वाळव्याच्या हुतात्मा सहकारी कारखान्याचा खर्च प्रती टन ६५६ रुपये हा सर्वात कमी आहे. ऊसतोडणी-वाहतूक खर्च जितका जास्त, तेवढा शेतकऱ्यांना आर्थिक फटका जादा होतो.

‘सकाळ’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राज्यातील गेल्या हंगामातील ऊस तोडणी व वाहतूक खर्चाचे आकडे सादर केले आहेत. हा खर्च एफआरपीच्या रकमेतून वजा करून शेतकऱ्याला अंतिम दर दिला जातो. हा दर कारखानानिहाय वेगवेगळा असतो. कारण अनेक कारखाने कार्यक्षेत्राबाहेर जाऊन ऊस आणतात. राज्य सरकारने १०.२५ साखर उताऱ्याला ३१५० रुपये एफआरपी जाहीर केला आहे. २०१७ पासून ऊस दर नियंत्रण समितीत ऊस वाहतुकीच्या अंतराचे टप्पे निश्‍चित करावेत, अशी मागणी सातत्याने शेतकरी संघटनेच्या सदस्यांकडून येत होती.

याबाबत ऊस दर नियामक समितीचे माजी सदस्य शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले म्हणाले की, ऊस दराची निश्‍चितीसाठी शासनपातळीवर अद्याप खूप मोठ्या संघर्षाची गरज आहे. दुर्दैवाने आंदोलकांची दिशा नेहमीच मुद्दे सोडून असते. वाहतूक खर्च ठरवण्यासाठी डिझेल दर हाच आधार असल्याने ते अवघड अजिबात नाही. मात्र, साखर आयुक्तालय आणि कारखानदार संगनमताने ते होऊ देत नाहीत. याप्रश्नी आणखी जागृती करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here