पुणे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या चालू वर्षीच्या गळीत हंगामाला लवकरच सुरवात होणार आहे. कारखाना चालू वर्षी, २०२३-२४ गळीत हंगामामध्ये उसाचा पहिला हप्ता २९०० रुपये प्रतिटन देणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली. कारखान्याच्या गव्हाण पूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
वालचंदनगर – भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सभासदांचा ८ लाख मेट्रीक टन व कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनचा २ ते २.२५ लाख मेट्रीक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. चालू वर्षी पाऊस की झाला आहे. गळीत हंगामामध्ये १०.२५ मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे असे अध्यक्ष काटे यांनी सांगितले. काटे म्हणाले की, शेतकऱ्यांनी केवळ या वर्षीच्या हंगामापुरता विचार करु नये. उसाचे जास्तीजास्त गाळप झाले तर साखर व मोलॅसेस उत्पादन तसेच वीज निर्मिती वाढ होणार असून कारखान्याच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल. तसेच विस्तारवाढ व सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जातून तसेच आर्थिक अडचणी मधून बाहेर पडण्यास मदत असून सभासदांना आणखी वाढीव ऊस दर देणे शक्य होईल. अधिकाधिक ऊस कारखान्याला गाळपास पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.