जयसिंगपुरात उद्या ‘स्वाभिमानी’ची २२ वी ऊस परिषद

कोल्हापूर : येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या, ७ नोव्हेंबर रोजी २२ वी ऊस परिषद होणार आहे. ऊस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी आंदोलनाची नवी दिशा स्पष्ट करणार आहेत. गेल्या वर्षीच्या उसाला प्रती टन अतिरिक्त ४०० रुपये द्यावेत, राज्यातील साखर कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल करावेत या प्रमुख मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ने आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आंदोलनाला गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माजी खासदार राजू शेट्टी उद्या काय बोलणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ऊस परिषद ऐतिहासिक ठरविण्यासाठी स्वाभिमानी संघटनेने नियोजन केले आहे. आक्रोश पदयात्रेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांत जनजागृती केली आहे. विक्रमसिंह मैदानावर यंदा स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सिद्धेध्वर मंदिर, दसरा चौक, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर आदी ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीची पदयात्रा उद्या, मंगळवारी सकाळी नांदणी येथे येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर २५ हजार शेतकऱ्यांना जेवणासाठी शिरोळ व हातकणंगले तालुक्यात प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून भाकरी गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here