कोल्हापूर : यंदा साखरेला चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे गळीत हंगामातील उसाला प्रती टन ३५ रुपये दर घेण्याची हीच संधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेच उसाला तोडणी घेवू नये, अन्यथा गेल्या हंगामातील पैसेही बुडतील आणि दर कमी मिळेल, असे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेने केले आहे. गेल्या हंगामात साखर कारखानदारांना साखरेसह इतर उपपदार्थांपासून प्रती टन ५,४०० रुपये उत्पन्न मिळाले आहे अला दावा संघटनेने प्रसिध्दी पत्रकातून केला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षात साखरेचा दर प्रती क्विंटल ७०० रुपये वाढला. पुढील वर्षभर साखरेचा दर वाढण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादन घटल्याने बगॅसलाही चांगला भाव मिळणार आहे. इथेनॉल बनवण्यासाठी मळीचा वापर होणार असल्यामुळे दारू बनवण्यासाठी मळी कमी मिळेल. त्यामुळे यावर्षी मळीतही ऐतिहासिक दरवाढ होणार आहे. अशा परिस्थितीत उसाचा दर कमी घेऊन गप्प का बसायचे? असा सवाल आंदोलन अंकुशचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सध्या उसाचा उत्पादन खर्च वाढल्याने ३ हजार रुपये हा दर परवडत नाही. यावर्षी उसाची टंचाई आहे आणि कारखान्यांना उसाची गरज आहे, हे ओळखून उसाचा दर प्रतिटनास ३५०० रुपयापर्यंत नेऊन ठेवायची संधी शेतकऱ्यांनी साधावी. ऊस दरात ‘एफआरपी’ च्या नावाखाली उसाचा दर नियंत्रित ठेऊन साखरेचे दर कमी कसे राहतील, हे सरकार पातळीवर पाहिले जात आहे. आता ‘एफआरपी’त शेतकऱ्याचे भागत नाही म्हणून आता शेतकरी परवडणारा दर मागत आहेत, असे संघटनेने म्हटले आहे.