सातारा : सह्याद्री तसेच जयवंत शुगरला केली जाणारी ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रोखून धरली. गेल्या हंगामातील ४०० रुपये देणे आणि चालू हंगामातील नव्या दरप्रश्नी आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
इंदोली (ता. कराड) येथे जयवंत शुगरला होणारी ऊस वाहतूक रोखून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, उपाध्यक्ष दादासाहेब यादव, स्वाभिमानी पक्ष जिल्हा अध्यक्ष देवानंद पाटील, तालुका अध्यक्ष प्रमोद जगदाळे, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, बापू साळुंखे, रामभाऊ साळुंखे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. तासवडे (ता. कराड) येथे सह्याद्री सह. साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखण्यात आली.
कारखान्यांनी मागील ४०० रुपये देणे व यावर्षीचा ऊस दर जाहीर करण्यासाठी राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेपूर्वी ऊस वाहतूक करू नयेत अशी मागणी करण्यात आली. याप्रश्नी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.