कोल्हापूर : बिद्री व भोगावती साखर कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रमाने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यापैकी बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे त्यांचे मेहुणे तथा माजी आमदार के. पी. पाटील यांना सोडून सवतासुभा मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत ए. वाय. पाटील यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. बिद्रीच्या निकालाचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.
बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी, दि. १७ नोव्हेंबर रोजी माघारीची अंतिम मुदत आहे. या दिवशी पाटील यांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ए. वाय. पाटील यांची राधानगरी तालु्क्यासह आसपासच्या तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी आतापर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीसह अनेक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. मात्र त्यांना ‘बिद्री’च्या अध्यक्षपद, आमदारकीची अपेक्षा आहे. यामध्ये त्यांना अद्याप यश आलेले नाही.
ए. वाय. पाटील यांनी यापूर्वी काही कार्यक्रम, पक्षाच्या मेळाव्यात आपली नाराजी व्यक्त केली होती. आता ते वेगळी भूमिका मांडण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे. तालुक्याच्या राजकारणात बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्षपद महत्त्वाचे मानले जाते. आता त्यांच्या या वेगळ्या भूमिकेसाठी त्यांना किती जण साथ देतील, याची उत्सुकता आहे. मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांपैकी ते कोणाच्या जवळ जातील याविषयी तर्क लढवले जात आहेत.