राजू शेट्टी यांनी स्वीकारले मंत्री हसन मुश्रीफ यांचे साखर विक्रीचे आव्हान

जयसिंगपूर :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला प्रती टन ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची केलेली मागणी रास्त असल्यानेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दोनदा बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, साखर कारखान्याच्या अध्यक्षांनी बैठकीकडे पाठ फिरवली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी मला जिल्ह्यातील मोजक्या कारखान्यांची माहिती दिल्यानंतर मी त्यामधून कसे ४०० रुपये देता येतात, याबाबत खुलासा केला. उर्वरित कारखान्यांची माहिती द्या. मी या सर्व कारखान्यांना कसा दर देता येतो, हे पुराव्यानिशी जाहीर करेन, असे प्रतीआव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले.

दरम्यान, सर्व साखर कारखान्यांच्या साखर विक्रीच्या तपासणीसाठी राजू शेट्टी यांनी कोणत्याही कारखान्यात यावे. सर्व साखर कारखाने त्यांना साखर विक्रीचे संपूर्ण रेकॉर्ड दाखवतील असे आव्हान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. रेकॉर्ड पाहिल्यावर शेट्टी यांचा साखर विक्रीच्या दराबाबतचा संभ्रम आणि गैरसमज दूर होईल. महाराष्ट्रातील कोणत्याही साखर कारखान्याने जर प्रतिटनाला ३ हजार ५०० रुपये ऊसदर दिला असेल, तर तो शेट्टी यांनी दाखवून द्यावा. मी आमच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील साखर विक्रीचे संपूर्ण अधिकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना देत आहे असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

याबाबत राजू शेट्टी म्हणाले की, मंत्री मुश्रीफ यांनी साखर विकण्याचे दिलेले आव्हान मी स्वीकारतो. यापेक्षा सर्व कारखान्यांनी दरमहा साखर कशी दराने व कोणाला विकली याचा खुलासा करावा, मग दूध का दूध व पानी का पानी होईल. सहकारी साखर कारखाने तोट्यात असले तरी याच लोकांचे खासगी कारखाने कसे नफ्यात आहेत असा सवाल त्यांनी केला. खासगी कारखान्यांनी ३० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत डिव्हीडंड दिला आहे. ज्या खासगी कारखान्यांनी सहकारी कारखाने भाडेतत्त्वावर घेऊन चालवले, ते ४०० कोटींपेक्षा जास्त कर्ज फेडून नफ्यात आणून इतरांपेक्षा जास्त दर देतात. मग हे सहकारी कारखान्यांना का जमत नाही असा सवाल त्यांनी केला. कर्नाटकातील कारखान्यांनी २९५० पासून जास्त दर जाहीर केला. हे कारखाने एफआरपीपेक्षा हे कारखाने ३०० रुपयांपेक्षा जास्त दर देत आहेत. तर मग यांच्याकडून एवढा पैसा अचानक आला कुठून याचे उत्तर द्यावे, असा प्रतीप्रश्न शेट्टी यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here