सातारा : सध्या ऊस दरावरून शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार उसाला प्रति टन ५,००० रुपये दर द्यावा, दुधाला प्रती लिटर शंभर रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांना टोल माफी करावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते, माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, असे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री जानकर यांनी कराड येथे ऊसदर, दूध दराबाबत सुरु असलेल्या बळीराजा शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
जानकर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर कराड ते पाटण संयुक्त ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. जानकर म्हणाले की, एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये असून, जगाच्या पोशिंद्याला आज राजकारण्यांपुढे भीक मागावी लागत आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. ते म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी सर्वसामान्य माणसांना राजकारणाची दारे खुली केली. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे काम केले. तसेच शेतकरी हिताचे निर्णय घेतले. आज शेतकऱ्यांना सर्वांनी पाठबळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.