कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आसुर्ले (ता. पन्हाळा) येथे दत्त दालमिया भारत शुगर साखर कारखान्याची उसाने भरलेली वाहने रोखली. पन्हाळा पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला करून ऊस वाहने सुरळीत कारखान्याकडे पाठवली.
साखर कारखान्यांनी गेल्या हंगामासाठी अतिरक्त प्रति टन ४०० रुपये द्यावेत आणि यंदाच्या हंगामासाठी प्रति टन ३५०० रुपये जाहीर करावा, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. या मागण्या मान्य न करताच गाळप सुरु करणाऱ्या कारखान्यांविरोधात संघटना आक्रमक झाली आहे. कारखान्यांना पाठविण्यात येणारा ऊस जागोजागी अडवला जात आहे. गुरुवारी सायंकाळी उसाने भरलेली वाहने कारखान्याकडे जात असताना आसुर्ले गावात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर रोखून धरले.
आंदोलनस्थळी धाव घेत पन्हाळा पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून ऊस वाहतूक पुन्हा सुरू केली. या आंदोलनामुळे कोतोली- नांदगाव रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते रामराव चेचर, विक्रम पाटील, उमेश शेलार, विलास पाटील, सरदार पाटील, दगडू गुरवळ, बाळासो पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.