उस्मानाबाद : एक टन उसातून किती साखर निघणार हे जमिनीच्या पोतावर, उसाचे बियाणे कोणते यावर अवलंबून असते. शेतकऱ्यांनी आगामी काळात को २६५ उसाच्या बियाण्याच्या नादाला लागू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जायचा असेल, भाव चांगला मिळवायचा असेल तर ८६०३२, ८००५, १०००१, १२१२१ ही उसाची बियाणी वापरावीत, असा सल्ला पवार यांनी दिला. उस्मानाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सध्या शेतं ओली आहेत, वापसा आलेला नाही. त्यामुळे आत्ता लगेच उसाची तोडणी झाली तर रिकव्हरी चांगली मिळणार नाही. रिकव्हरी चांगली आली तरच साखर जास्त मिळते. काही ठिकाणी १० टक्के, ११ टक्के, १२ टक्के निघते. कोल्हापुरात तर टनामागे ११४ किलो म्हणजे १४ टक्के साखर निघते. एवढा विरोधाभास आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगले बियाणे वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री पवार म्हणाले की, मागील दोन वर्षात राज्याच्या ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखरेचे देखील चांगले उत्पादन राज्यामध्ये झाले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नवीन उसाचे बियाणे तयार करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कमी पाण्यात उसाचे उत्पादन जास्त येईल यावर संशोधन करत आहेत. त्यातून काही वाणांचा शोध लागला आहे, असे त्यांनी सांगितले.