सातारा : सातारा जिल्ह्यात १५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा ऊस गाळपात अंदाजे २९ लाख टनांइतकी वाढ होण्याची शक्यता साखर आयुक्तालयाने वर्तवली आहे. एक कोटी २८ लाख टनाइतके ऊस गाळप होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादन घटण्याचा अंदाज साखर कारखान्यांनी व्यक्त केला आहे.
यंदा ९ सहकारी आणि ८ खासगी कारखान्यांपैकी १५ साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. चालू हंगामात कारखान्यांकडे असलेले आडसाली उसाचे क्षेत्र ३९ हजार ३२९ हेक्टर, पूर्वहंगामी लागवडीतील ऊस क्षेत्र २७ हजार ५०९ हेक्टर, सुरू लागवडीतील क्षेत्र सुमारे १६ हजार ५१५ हेक्टर तर खोडवा ऊसाखालील क्षेत्र ३३ हजार ३५८ हेक्टर असे एकूण १ लाख १६ हजार ७११ हेक्टर इतके क्षेत्र आहे.गेल्या वर्षी १५ कारखान्यांकडून ९९ लाख २३ हजार ८३७ टनाइतके ऊस गाळप होऊन एक कोटी सव्वीस लाख आठ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होती. त्या तुलनेत यावेळी ऊस उत्पादनात वाढ होऊन ते सुमारे सव्वाकोटी टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे.