नगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदाच्या हंगामात साडेतीन हजारांची पहिली उचल मागितली आहे. तर रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने प्रती टन पाच हजार रुपये दराची मागणी कली आहे. केंद्राने ३१५० रुपये हमीभाव दिला असला तरी उत्पादन खर्च अधिक आहे असे संघटनांसह शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. साखर कारखान्यांना इथेनॉल, डिस्टलरी, मळी, भुसा, इत्यादी सह उत्पादनातून आर्थिक उत्पन्न मिळत आहे. बहुतांशी कारखान्यांनी मात्र संघटनांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून इतरांच्या बरोबरीने भाव देऊ असे सांगत हंगाम सुरु केला आहे. साखर कारखानदारांनी अद्याप मागण्या मान्य न केल्याने ऊस दराचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाने दडी मारल्याने राज्यात ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. नगर विभागातही कमी पावसामुळे ऊस उत्पादनात तब्बल २५ ते ३० टक्क्यांची घट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सद्यस्थितीत १ लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असा अंदाज प्रादेशिक साखर संचालक विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, विभागातील शेतकऱ्यांनी जो जास्त दर जाहीर करेल, त्यालाच ऊस देण्याची मानसिकता तयार केल्याचे दिसते. येथील प्रसाद शुगरने २७०० रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. ऊस दराबाबत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की, नेवाशात रघुनाथदादा पाटील यांनी ऊस परिषदेत प्रति टन ५,००० रुपये दर देण्याची मागणी केली. अद्याप कारखानदारांनी दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे लवकरच थेट कारखान्यात जाऊन गव्हाणी बंद पाडणार आहोत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले की, साडेतीन हजार रुपये पहिली उचल जाहीर करण्याची आमची मागणी आहे. कारखान्यांनी ही मागणी मान्य करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा कारखान्याकडे जाणाऱ्या गाड्या अडवून आम्ही आंदोलन तीव्र करू.