सांगली : ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी बोरगाव परिसरात राजारामबापू, कृष्णा साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखली. यावेळी बैलगाडी, ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले. परिसरातील ऊस तोडणी बंद पाडली. उसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल, असा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला.
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी बहे तांबवे, नरसिंहपूर, खरातवाडी हुबालवाडी, बोरगाव, फार्णेवाडी, जुनेखेड, नवेखेड परिसरात ऊस तोडी बंद पाडल्या. काही ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेती अधिकाऱ्यांमध्ये वादही झाला. त्यानंतर ऊस तोडणी बंद ठेवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, संतोष शेळके, शहाजी पाटील, पंडित सपकाळ, प्रदीप पाटील, प्रताप पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, शामराव जाधव, सचिन यादव, दिनकर पवार उपस्थित होते.
बोरगाव येथे राजारामबापू कारखान्याकडे ऊस भरून निघालेले ट्रॅक्टर, बैलगाड्यांची हवा सोडण्यात आली. बहे पूल व बहे हायस्कूलनजीक कृष्णा साखर कारखान्याकडे निघालेले ट्रॅक्टर, बैलगाड्यांची हवा सोडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव म्हणाले की, साखरेला यंदा भाव ३७०० रुपयांच्या पुढे आहे. उपपदार्थांना चांगला दर असताना साखर कारखानदार दराबाबत आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. यापुढे आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहे.