देशभरात आतापर्यंत २६३ कारखान्यांचे गाळप सुरू

मुंबई : देशभरात गाळप हंगाम सुरु झाला असला तरी ऊस गाळप आणि साखर उत्पादनाची गती गेल्या वर्षीच्या तुलनेत संथ आहे. देशभरात १५ नोव्हेंबर २०२३ अखेर २६३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. आतापर्यंत १६२ लाख टन उसाचे गाळप झाले. गेल्यावर्षी याच काळात ३१७ कारखाने सुरु झाले होते. गेल्यावर्षीच्या समान कालावधीत झालेल्या गाळपाच्या तुलनेत यंदा ८४ लाख टन गाळप कमी झाले.

नव्या हंगामात आतापर्यंत १२ लाख ७५ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी समान कालावधीत साखर उत्पादन २० लाख टनांपर्यंत पोचले होते. सरासरी साखर उतारा देखील ०.३५ टक्क्यांनी कमी आहे. याबाबत राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की, यंदा उत्तर प्रदेशातील साखर कारखाने पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले. मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साखर हंगाम १ नोव्हेंबरनंतर सुरु झाला. सध्या पश्चिम महाराष्ट्रात ऊस दर आंदोलन सुरू आहे. नव्या हंगामाचे अनेक कारखान्यांमध्ये उद्घाटन झाले, पण ते कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत.

यंदा इथेनॉल निर्मीतीसाठी ४० लाख टन साखर वळवल्यानंतर साखरेचे उत्पादन २९१ लाख टन इतकेच होण्याचा केंद्र शासनाचा अंदाज आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे ऊस गाळप व साखर उत्पादन गत वर्षीच्या तुलनेत कमी राहणार आहे. गेल्यावर्षी साखरेचे उत्पादन ३३९ लाख टन झाले होते. आणि ४३ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here