सातारा / कराड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रेठरे खुर्द येथे कृष्णा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणारी वाहने गुरूवारी सकाळी रोखून धरली. ऊस वाहतूक करणाऱ्या ४० बैलगाड्या, ५० ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखले. कारखान्याने पाच दिवसांपूर्वी आश्वासन देवून ऊस दर जाहीर न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत ऊस वाहतूक रोखली. जोपर्यंत ऊस दराचा तोडगा निघत नाही, तोपर्यंत ऊस वाहतूक सोडणार नाही अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
स्वाभिमानीने गेल्यावर्षीच्या उसाला ४०० रुपये दुसरा हप्ता आणि यंदा ३५०० रुपये दर जाहीर करावा या भूमिकेसाठी आंदोलन तीव्र केले आहे. गुरुवारी कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारी ४० बैलगाडी, ५० ट्रॅक्टर वाठार रेठरे बुद्रुक रोडवरील जाई मोहिते प्रशालेजवळ कार्यकर्त्यांनी रोखून धरले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. कार्यकर्त्यांनी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. तोडगा निघत नाही, तोपर्यंत वाहतूक सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. यावेळी कारखान्याला आणखी दोन दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील यांनी दिली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड तालुकाध्यक्ष बापुसाहेब साळुंखे, उत्तम साळुंखे, रामचंद्र साळुंखे, वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव, सतिश यादव, शिवाजी पाटील, उत्तम पाटील, भिकशेठ तोडकर, तानाजी गावडे, प्रदीप पाटील, दादासाहेब यादव, प्रमोद जगदाळे, अर्जुन साळुंखे, दिलीप गोंदकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. बळीराजा शेतकरी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दिला. कराड ग्रामीण पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.