चंदगड तालुक्यात अज्ञातांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवला

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील हेमरस साखर कारखान्याकडे निघालेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर चार अज्ञातांनी पेट्रोलचे पेटते बोळे फेकून ट्रॅक्टरला आग लावली. यामध्ये ट्रॅक्टर जळून खाक झाला. बोडकेनट्टी येथे हा प्रकार घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला आहे. यात तावरेवाडी (ता. चंदगड) येथील उत्तम कागणकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर जळून खाक झाला.

कर्नाटक-बेळगाव सीमाभागातील बोडकेनट्टी या गावाजवळ ही घटना घडली. त्यामुळे तालुक्यात वातावरण तापले आहे. कागणकर यांच्या मालकीचा डबल ट्रॉलीचा ट्रॅक्टर (एमएच ०९ सीजे ९५६१) हेमरस साखर कारखान्याला ऊस घेवून येत असताना पेटवण्यात आला. त्यामुळे कागणकर यांचे सुमारे ८ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यांनी याबाबत कागणकर यांनी काकती (ता. जि. बेळगाव ) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्डयाण्णावर यांचे हेमरस साखर कारखान्यावर ऊस दरासाठी उपोषण सुरू आहे. मात्र, ट्रॅक्टर पेटवण्याच्या या घटनेशी संघटनेचा संबंध नसल्याचे गड्याण्णावर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here