कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये व यंदाची पहिली उचल ३५०० रुपये द्यावी यासाठी विविध पातळ्यांवर आंदोलन केले. आता साखर कारखान्यांवर जाऊन सभासदांची जागृती सुरू आहे. तरीही सरकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारला जाग येत नसल्याने रविवारी (दि. 19) राज्यभर चक्काजाम आंदोलन करून शेतकऱ्यांची ताकद दाखवणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला. कुडित्रे येथील कुंभी कार्यस्थळावर थकीत दुसरा हप्ता, यंदाची उचल या मागण्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटना ऊसदरासाठी लढत आहे. सर्वच कारखान्यांना ऊसतोडी बंद ठेवण्याचे आवाहन करत आहे; पण डी. वाय. पाटील साखर कारखाना याला न जुमानता सुरू आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गट तयार करून तो आजच्या आज बंद पाडावा. सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही राजव्यापी रास्ता रोको करून सरकारचे लक्ष वेधणार आहोत. त्यामुळे आगामी काळातील घटनांना सरकार जबाबदार असेल. यावेळी बाजीराव देवाळकर, पांडुरंग शिंदे, रामचंद्र पाटील, सुनील कापडे, टी. एल, पाटील, राजू सूर्यवंशी, अर्जुन पाटील, गुणाजी शेलार, दादामामा कामिरे, राम चेचर, संजय केळुसकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.