सांगली : साखर कारखान्यास ऊसतोड कामगार व वाहन पुरवतो म्हणून उचल घेऊन ३ कोटी ३० लाख ४० हजार ३२० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत तुरची एसजीझेड अँड एसजीए शुगर्स लिमिटेड कारखान्याकडून २१ जणांविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखान्याचे शेती क्लार्क प्रकाश जमदाडे यांनी याबाबत उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
कारखान्याने दिलेल्या फिर्यादीनंतर संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयितांनी कारखान्याला ऊस तोडणी मजूर, वाहने पुरविण्याचे आश्वासन दिले होते. त्यापोटी त्यांनी कारखान्याकडून सुमारे ३ कोटी ३० लाख ४० हजार रुपये घेतले आणि मजूर, वाहने पुरविण्यास टाळाटाळ करून फसवणूक केली असे या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी, यतनाळ (जि. विजापूर), करेवाडी तसेच तिकोंडी (ता. जत), राजनाळ (ता. इंडी) येथील बबन कोळेकर, लालसाब मुल्ला, मायाप्पा गोफणे, अशोक गादामट्टी, महादेव करे, सागर वानखंडे, महादेव कोळेकर, शंकर कोळेकर, अंकुश करात, सदाशिव ईरळी, रामू बळूर, राजू तांबे, बाबू शेंडगे, अरुण लोहार, आकाश बळूर, रेवणसिद्ध गोफणे, विनोद तांबे, विठ्ठल कोळेकर, मलापा लोखंडे, कामू लोखंडे आदी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.