सोलापूर : मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने तालुक्यात सर्वोच्च दर देण्याची परंपरा यंदाच्या गळीत हंगामातही कायम राखली आहे. चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन २७०० रुपये पहिली उचल देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष ॲड. बी. बी. जाधव यांनी केली आहे.
जिल्ह्यात उसाचे क्षेत्र कमी असल्याने यंदाचा गळीत हंगाम जास्त दिवस चालणार नसल्याचे चित्र आहे. सर्वच कारखान्यांना यंदा उसाची टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याच कारखान्याला ऊस घालावा यासाठी कारखान्याच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध कारखान्यांनी आपल्या हप्त्याची घोषणा केली आहे.
मोहोळ तालुक्यात भीमा, लोकनेते बाबुराव पाटील, आष्टी शुगर आणि जकराया हे चार कारखाने कार्यरत आहेत. भीमा कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा पंचवीसशे पंचवीस रुपये पहिला हप्ता देण्याची घोषणा करुन ऊस दराची कोंडी फोडण्यात पुढाकार घेतला आहे. जकराया साखर कारखान्याने मात्र भीमा, आष्टी आणि लोकनेते कारखान्यांच्या पुढे जाऊन दोन हजार सातशे रुपये पहिला हप्ता एकरकमी जाहीर केला.
गतवर्षी तालुक्यातील सर्वच कारखान्यांनी २३०० अंतिम दर दिला, मात्र जकराया शुगरने दिवाळी सणासाठी पन्नास रुपयांचा हप्ता जास्त देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली. जकरायाचा गतवर्षीचा २३५० रुपये हा दर तालुक्यात उच्चांकी ठरल्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, संचालक राहुल जाधव, मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर, केन मॅनेजर विजय महाजन, वित्त अधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते.