सोलापूर : श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने ज्या ठिकाणची चिमणी पाडण्यात आली, त्याच ठिकाणी चिमणी बांधकामास परवानगी मागितली आहे. यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय सचिवांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्याचे उत्तर आल्यानंतरच पुढील कार्यवाही महापालिका प्रशासन करेल, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. काही महिन्यापूर्वी विमानतळाला अडथळा ठरणारी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी न्यायालयीन निर्णयानंतर जमीनदोस्त करण्यात आली होती. त्यातून सोलापूर जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले होते.
चिमणी पाडल्यानंतर पुन्हा सिध्देश्वर साखर कारखान्याने सोलापूर महानगरपालिकेकडे ३० मीटर उंचीची चिमणी बांधण्यासाठी परवानगी मागितली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय सचिव यांच्याकडून हरकत नसेल तर पुढील कार्यवाही करण्यात येईल. युडीसीपीआर नुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महापालिकेने २७ एप्रिल २०२३ रोजी श्री सिध्देश्वर साखर कारखान्यास अनधिकृत ठरविण्यात आलेली चिमणी ४५ दिवसांत स्वतःहून पाडून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र कारखान्याने स्वतःहून चिमणी न पाडल्याने अखेर महापालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात ही चिमणी पाडण्यात आली. आता चिमणी पुन्हा बांधण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय सचिवांच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची प्रतीक्षा लागली आहे.