कोल्हापूर : जिल्ह्यातील कारखानदारांकडे एफआरपीपेक्षाही जादा पैसे देणे लागते. परंतु त्यांना पैसे द्यायचे नसल्याने समिती करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. गेल्यावर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये आणि यंदा ३,५०० रुपये पहिली उचल द्यावी या मागणीवर अद्याप तोडगा न निघाल्याने शेट्टी यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी दोन दिवसांत निर्णय न झाल्यास गुरूवारी बेमुदत (ता. २३) राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहे. यावेळी शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. माझ्यासोबत काही कारखानदार चर्चेसाठी तयार होते परंतु काही कारखानदारांनी बोलणी करत असलेल्या कारखानदारांवर दबाव टाकून चर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी दिलेल्या अहवालानुसार कारखानदार आता कोणतेही देणे लागत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु आमच्या माहितीनुसार जिल्ह्यातील ९ कारखानदार जवळपास १५० ते ३०० रुपये जादा दर देणे शक्य आहे. परंतु त्यांनी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मी यापूर्वीच समिती नेमण्याचा विरोधात होतो आणि यापुढेही विरोधात राहणार आहे. आम्ही आता मैदान सोडायचं नाही. शेतकरीही कारखानदारांना आमच्यापुढे झुकायला लावल्याशिवाय मागे हटणार नाही.