कोल्हापूर : राजू शेट्टी यांनी गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील उसाला ४०० रुपये आणि चालू हंगामातील पहिली उचल ३,५०० रुपये मिळवून दिल्यास मी राजकीय संन्यास घेईन. मात्र याची पूर्तता न केल्यास शेट्टी यांनीसुद्धा कोणतीही निवडणूक लढवू नये, असे आव्हान रयत क्रांती संघटनेचे संस्थापक तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. माजी खासदार शेट्टी यांचा थेट उल्लेख न करता त्यांनी जोरदार टीका केली. यावेळी शेट्टी यांनी गेल्या हंगामातील उसाला २०० रुपये आणि चालू हंगामातील उसाला ३,२५० रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. रामचंद्र डांगे आगामी दोन दिवसांत कारखानदारांशी चर्चा करतील आणि लवकरच ऊस आंदोलनाची कोंडी फुटेल, अशी माहिती त्यांनी दिली.
माजी मंत्री खोत म्हणाले की, चळवळीत शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करण्याची गरज आहे. मागणी करताना तडजोडीलाही वाव द्यायला हवा. यंदा उसाचे क्षेत्र घटल्याने साखरेचे उत्पादनही घटणार आहे. हंगाम लांबल्याने शेतकरी आणि कारखाने या दोघांचेही नुकसान होणार असल्याने त्याचे भान ठेवावे. चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. रामंचद्र डांगे म्हणाले की, कारखाने शेतकऱ्यांना योग्य दर देण्यास तयार असतील तर त्याला कोणी विरोध करू नये. महाराष्ट्र क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी मत मांडले. दिलीप माणगावे, प्रकाश पाटील उपस्थित होते.