कोल्हापूर : बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांचा कारभार सभासदांच्या हिताचा नव्हे, तर स्वहिताचाच आहे. त्यांची एकाधिकारशाही सभासदांच्या उत्कर्षाला व कारखान्याच्या विकासाला मारक ठरत आहे, अशी टीका खासदार संजय मंडलिक यांनी केली. तुरंबे (ता. राधानगरी) येथील गणेश मंदिराच्या प्रांगणात बिद्री साखर कारखाना निवडणुकीचा राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार प्रारंभ करण्यात आला. आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले की, मी गेली ३५ वर्षे के. पी. पाटील यांच्यासोबत होतो; मात्र त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले नाही. सगळे आपल्यालाच ही त्यांची भूमिका सहकारासाठी मारक आहे. त्यामुळे आता आम्ही थेट भूमिका घेतली आहे. समरजितसिंह घाटगे यांनी, बिद्री साखर कारखाना सभासदांच्या हातात सोपवण्यासाठी आमची लढाई आहे. तर आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, बिद्रीच्या हिताचा कारभार करण्यासाठी परिवर्तन आघाडीची रचना केली आहे. माजी आमदार अमल महाडिक यांनी बिद्री कारखाना हा सभासदांच्या हातात राहावा यासाठी परिवर्तन आघाडीसोबत आहोत, असे सांगितले.
यावेळी मारुती जाधव, संचालक बाबासाहेब पाटील, चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील यांची भाषणे झाली. कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, अभिजित तायशेटे, प्रा. किसन चौगुले, बाबासाहेब पाटील, नंदकुमार ढेंगे, अर्जुन आबिटकर, अरुण जाधव, युवराज वारके, विजय बलुगडे उपस्थित होते. प्रा. राजेखान जमादार यांनी सूत्रसंचालन केले. अरुण जाधव यांनी आभार मानले.