कोल्हापूर : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला साखर कारखान्यात निवडून दिले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न साखर कारखान्याच्या अध्यक्षांसमोर मांडायचे नसतील, तर तुम्ही राजीनामे द्यावेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध साखर कारखान्यांच्या संचालकांना दिला. गेले महिनाभर रेंगाळलेल्या ऊस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध साखर कारखान्यांच्या साखर कारखाना संचालकांची भेट घेतलली. संचालकांची भेट घेऊन अनेक मागण्या मांडल्या.
आम्हा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून साखर कारखान्यात तुम्हाला निवडून देतोय. ऊसदराचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कोणते प्रयत्न केले. तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहात की कारखानदारांच्या, हे अगोदर स्पष्ट करावे अशी प्रश्नांची सरबत्ती सावकर मादनाईक यांनी केली. ते म्हणाले की, गेले दोन महिने ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तरीही तुम्ही संचालक काहीही प्रयत्न करीत नाही असे चित्र आहे. उपस्थित संचालकांनी आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहोत, तुमच्या भावना संचालक मंडळाच्या बैठकीत मांडतो, अशी ग्वाही दिली. राम शिंदे, शैलेश आडके, जवाहर साखर कारखान्याचे संचालक गौतम इंगळे, शरद कारखान्याचे संजय नांदणे, संजय बोरगावे, पंचगंगा कारखान्याचे धनगोंडा पाटील, रावसाहेब भगाटे, राजगोंडा पाटील, ऋतुराज देसाई आदी उपस्थित होते.