सांगली : ऊसदर प्रश्नी भाजप किसान मोर्चा आक्रमक झाला आहे. ऊसदराच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप किसान मोचनि बुधवारी सांगली जिल्हा बँकेसमोर बँड वाजवत आंदोलन केले. बँकेच्या प्रवेशद्वारात ट्रॅक्टर आडवा लावत प्रवेश रोखून धरला. बड्या कारखानदारांच्या दडपशाहीमुळेच ऊस दराचा प्रश्न भडकला आहे, असा आरोप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केला. पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. बँकेच्या अध्यक्षांसह अनेक संचालक हे साखर कारखानदार आहेत. ऊसदरप्रश्नी त्यांना घेराव घालण्याचा इरादा आंदोलकांनी स्पष्ट केला होता. मात्र अध्यक्ष, संचालक कोणीच बँकेकडे फिरकले नाहीत.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, विशाल पवार, चंद्रकांत सूर्यवंशी, सचिन घेवारे, उदय बेलवलकर, रेखा पाटील तसेच कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांना निवेदन दिले. पवार म्हणाले, गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाला ५०० रुपये देणे शक्य आहे. मात्र कारखानदारांनी शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. ऊस उत्पादक शेतकरी, तोडकरी आणि वाहतूकदार या सर्वांना कारखान्यांनी मुद्दाम वेठीस धरले आहे. पवार म्हणाले, कारखान्यांनी २०२२-२३ च्या हंगामातील साखर, उपपदार्थांचा हिशेब द्यावा. काही बडे कारखानदार हेच साखर, मोलॅसिस, अल्कोहोल व अन्य उपपदार्थांचे मोठे व्यापारी आहेत. त्यांची नफ्या-तोट्याची गणिते आणि दडपशाहीमुळेच दरवर्षी ऊसदराचा प्रश्न पेटत आहे. ऊस खरेदी ते साखर, मोलॅसिस व सर्व उपपदार्थांची विक्री या साऱ्या व्यवहारांचे थर्डपार्टी ऑडिट करावे, अशी मागणीही पवार यांनी केली.