लातूर : मांजरा समुहातील साखर कारखान्यांकडून यावर्षी उसाला २,५०० रुपये पहिली उचल देण्यात येणार आहे. तोंडार (ता. उदगीर) येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक दोनचे कार्यकारी संचालक ए. आर. पवार यांनी ही माहिती दिली. उसाचे गाळप नियोजनबद्ध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी एक महिन्यापूर्वी गाळपाला सुरुवात झाली. मात्र अद्याप दर निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना पहिली उचल दिली गेली नाही. आता मांजरा परिवाराने दर जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल.
उदगीर तालुक्यातील उसाचे गाळप मांजरा परिवारातील विलास युनिट क्रमांक दोन व तळेगाव (ता. देवणी) येथील जागृती शुगर या दोन साखर कारखान्यांमध्ये प्रामुख्याने केले जाते. यावर्षी पहिल्या वर्षीचा व खोडवा या दोन्ही प्रकारच्या उसाचे सरासरी उत्पादन कमी येत आहे. कार्यकारी संचालक पवार यांनी सांगितले की, विलास युनिट क्रमांक दोन या साखर कारखान्याचे नियोजनबद्ध गाळप सुरू आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयाने यावर्षी जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे.