छत्रपती कारखाना प्रतिटन पहिला हप्ता तीन हजार रुपये देणार : अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील

पुणे : इंदापूर तालुक्यातील भवानीनगरच्या श्री छत्रपती कारखान्याने या हंगामातील उसाच्या हप्त्याची रक्कम पुन्हा वाढवली असून, एकरकमी ३ हजार रुपये पहिला हप्ता कारखाना देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी जाहीर केले. श्री छत्रपती साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला असून, या हंगामात कारखान्याने नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.

श्री छत्रपती साखर कारखान्याने मागील दहा दिवसांपूर्वीच या हंगामातील गाळपास येणाऱ्या उसाला पहिला हप्ता म्हणून प्रतिटनी २९०० रुपये हप्ता जाहीर केला होता. मात्र, त्यानंतर दि. २१ रोजी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व अमोल पाटील यांनी पुन्हा यामध्ये शंभर रुपयांची भर घालत, हा दर तीन हजार रुपये प्रतिटन या विक्रमी हप्त्याची घोषणा केली आहे.

काटे व पाटील म्हणाले कि, या हंगामात ठरल्यानुसार गाळपाचे उद्दिष्ट पार पडले तर कारखान्यापुढील सहवीजनिर्मिती, विस्तारवाढ यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होऊन कारखाना सुस्थितीत येण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्षेत्रातील उच्च साखर उताऱ्याचा ऊस सभासदांनी केवळ या हंगामापुरता विचार करून जर बाहेरील कारखान्यांना घातला नाही, तर ऊस उत्पादकांना याहूनही अधिकचा दर देण्यासाठी कारखान्याला संधी असल्याचे मत देखील काटे व पाटील यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here