बासमती तांदळाचे दर तेजीत, निर्यातीमुळे मागणी वाढली

पुणे : यंदा पावसाने दडी मारल्याचा आणि अवकाळी पावसाचा फटका बासमती तांदळाच्या उत्पादनाला बसला आहे. भात पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे तांदळाचे उत्पादन घटले आहे. निर्यातीसाठीदेखील मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तांदळाच्या दरात प्रती क्विंटल पाचशे ते एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, देशात उत्पादित होणाऱ्या बासमती तांदळाच्या निम्मा निर्यात केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात ४६ लाख टन बासमतीची निर्यात झाली होती, अशी माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी दिली. गेल्यावर्षी देशात बासमती तांदळाचे १०० ते ११० लाख टन उत्पादन झाले होते. यावर्षी हे उत्पादन ८० ते ९० लाख टन होईल अशी शक्यता आहे.

बासमतीच्या काही प्रकारच्या तांदळाचे दर गेल्या आठवड्यापर्यंत प्रती क्विंटल ३३०० ते ३४०० रुपये होते. ते आता ४००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पूसा ११२१ बासमतीचा दर ४६०० रुपये प्रती क्विंटल झाला आहे. गेल्यावर्षी बिगरबासमती तांदळाची निर्यात वाढल्यामुळे मार्च आणि एप्रिलमध्ये बासमतीशिवाय इतर तांदळाचे दर वाढले होते. किमान निर्यात शुल्क (एमइपी) वाढवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ‘एमइपी’नुसार दर वाढल्याने गेल्यावर्षी बासमती तांदळाची खरेदी थांबली होती.

सरकारने ‘एमइपी’चे दर घटवल्यानंतर निर्यातदारांनी खरेदी पुन्हा सुरू केली. त्यानंतर निर्यातीत सुधारणा झाली होती. सद्यस्थितीत तांदळाचे उत्पादन कमी असून बाजारात दर्जेदार मालाला जास्त मागणी आहे. सौदी अरेबिया, इराण, इराक, मस्कत, कुवेत, युरोप येथून बासमतीला मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here