पुणे : राज्यात सरकारच्या आदेशानुसार १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू झाला आहे. गेल्या २० ते २२ दिवसांपासून कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. आतापर्यंत दहा साखर कारखाने सुरू झाले असून त्यांनी आतापर्यंत ११ लाख ८७ हजार ४०३ टनाचे गाळप केले असून त्याद्वारे ९ लाख ४६ हजार २५५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर साखर उतारा ७.९७ टक्के एवढा आहे.
जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास १८ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज झाले आहेत. त्यापैकी दहा कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. यामध्ये सहकारी ६ व खासगी ४ कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख २२ हजार टन एवढी आहे.
पुणे जिल्ह्यातील बहुतांशी सर्व साखर कारखाने दिवाळीपूर्वी, दिवाळीनंतर सुरू झाले आहेत. त्यामुळे साखर कारखाना कार्यस्थळावर हळूहळू वर्दळ वाढत आहे. जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टरवर उसाच्या लागवडी झाल्या आहे. यंदा गाळपासाठी सुमारे सव्वालाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
‘बारामती ॲग्रो’ने ऊस गाळपात आघाडी घेतली असून चालू गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती साखर कारखान्यांच्या सूत्रांनी दिली. यंदाच्या गाळप हंगामात ऊस तोडणीसाठी तोडणी मजुरांऐवजी, ऊस तोडणी यंत्राचा वापर जास्त केला जात आहे.