‘स्वाभिमानी’ने नऊ तास रोखला महामार्ग, वाहतूक ठप्प

कोल्हापूर : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी पुणे-बंगळुरू महामार्ग तब्बल नऊ तास रोखून धरला. गेल्या हंगामातील उसाला प्रती टन ४०० रुपयांचा दुसरा हप्ता आणि यंदा ३,५०० रुपये पहिली उचल द्यावी, जोपर्यंत हा निर्णय होणार नाही, तोपर्यंत जागेवरून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. कार्यकर्त्यांनी महामार्गावरील पंचगंगा पुलाजवळ ठिय्या आंदोलन करत महामार्ग रोखून धरल्याने मुंबई, पुणे, सांगली, सोलापूरसह कर्नाटकात जाणारी वाहतूक ठप्प झाली. जवळपास नऊ तासानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

गेल्या दीड महिन्यांपासून ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे. जिल्हा प्रशासानसोबत कारखानदारांच्या उपस्थितीत या मागणीबाबत बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या तोडग्याअभावी निष्फळ ठरल्या. त्यानंतर ‘स्वाभिमानी’ने महामार्गावर चक्का जामचा इशारा दिला होता. गुरुवारी जिल्ह्यासह सांगली, सातारा जिल्ह्यांतून सकाळी साडेआठ- वाजल्यापासून कार्यकर्ते आंदोलनस्थळी आले. सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या मांडला. माजी खासदार राजू शेट्टी दुपारी १२ वाजता आंदोलनस्थळी आले. यावेळी ‘ऊस आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा’, ‘एकच गट्टी, राजू शेट्टी,’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

माजी खासदार राजू शेट्टी, ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक आदींसह कार्यकर्त्यांनी महामार्गावरच दिवसभर ठाण मांडले. भर उन्हातही, दुपारी कार्यकर्ते महामार्गावरून बाजूला हटले नाहीत. यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही आंदोलनात तडजोडीची तयारी ठेवली आहे. ४०० रुपयांऐवजी १०० रुपये घेण्याची तयारी दाखवूनही कारखानदार तडजोड करायला तयार नाहीत. सरकार आणि त्यांची मिलीभगत आहे. विरोधी पक्षदेखील आवाज काढायला तयार नाहीत. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत महामार्गावरून बाजूला हटणार नाही. यावेळी राजेंद्र गड्ड्याण्णवार, प्रा. जालिंदर पाटील, युवा आघाडीचे अजित पोवार, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, दुपारी आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. थेट महामार्गावरच पंगत बसवण्यात आली. आंदोलनस्थळी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्यासह सुमारे १००० पोलिस आणि १०० अधिकारी, शीघ्र कृती दल, राज्य राखीव दलाच्या तुकड्या यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची पथके असा फौजफाटा तैनात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here