कोल्हापूर : ऊस दरावर तोडगा निघाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर जिल्ह्यात ऊस तोडणीला गती आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या महिन्याभरापासून गेल्या हंगामातील उसाला प्रती टन ४०० रुपये मिळावे आणि यंदा ३,५०० रुपयांची पहिली उचल मिळावी यासाठी आंदोलन सुरू केले होते. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापुरातील पंचगंगा पुलावर आंदोलन केले.
सुमारे नऊ तास महामार्ग रोखून धरला. सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन तोडगा काढण्यात आला. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचे आंदोलन केल्याबद्दल राजू शेट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर शिरोली औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेतल्यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. शेट्टी यांनी साखर कारखानदारांशी संगनमत करून आंदोलन केले असा आरोप त्यांनी केला. प्रती टन ५०, १०० रुपये दरवाढ घेवून शेट्टी यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली ,असा आरोप त्यांनी केला. त्यावर शेट्टी यांनी, कोणाला खुमखुमी असेल तर त्याने आंदोलन करून अधिक दर मिळवून द्यावा, असे प्रत्युत्तर दिले आहे.