सांगली : सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यंदाच्या हंगामात उसाला प्रती टन ३,१०० रुपये उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री तथा आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी ही माहिती दिली. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. दरम्यान, ऊस दरप्रश्नी आज, सोमवारी पुन्हा कारखानदारांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.
आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या पुढाकाराने कडेगाव येथे कारखानदारांची बैठक झाली. यावेळी ३,१०० रुपये प्रती टन ऊस दर देण्याचा निर्णय झाला. आमदार कदम यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. बैठकीला खासदार संजय पाटील, क्रांती कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार अरुण लाड, आ. मानसिंगराव नाईक, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, उदगिरी शुगरचे उत्तमराव पाटील, युवा नेते विशाल पाटील, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, दत्त इंडियाचे जितेंद्र धारु, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी आदी उपस्थित होते.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी गतवर्षी ३ हजाराच्या आत असलेल्या कारखान्यांनी १०० रुपये आणि ३ हजारापेक्षा अधिक दर दिलेल्यांनी ५० रुपये जादा देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय एकरकमी एफआरपी देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी ठोस भूमिका घेतली नव्हती. जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळपास सुरुवात झाली असली तरी अद्याप ऊस दराची कोंडी फुटलेली नाही. कडेगाव येथील साखर कारखानदारांच्या बैठकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी कारखानदारांच्या बैठकीतील निर्णय अमान्य असल्याचे सांगितले. तर आ. विश्वजीत कदम यांनी सोमवारी कारखानदारांशी व खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.