कोल्हापूर : महाराष्ट्रात 2023-24 च्या हंगामातील उसाला भाव देण्यात कोल्हापूर जिल्हा सर्वात पुढे आहे. जिल्ह्यातील रेणुका शुगरच्या पंचगंगा कारखाना युनिटने प्रति टन कोणतीही कपात न करता 3,300 रुपये असा उच्चांकी दर जाहीर केला आहे. राज्यात आतापर्यंत जाहीर केलेला हा सर्वाधिक दर आहे. सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, पुणे, लातूर आदी जिल्ह्यांतील कुठल्याही साखर कारखान्याने अद्याप एवढा दर जाहीर केलेला नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसासाठी ४०० रुपये जादा देण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. गेल्या दोन महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश आणि अन्य विविध शेतकरी संघटनांनी केलेल्या ऊस दर आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील उसाचे मिळणार एक अब्ज रुपये!
शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावेत, यासाठी गेले दोन महिने साखर कारखानदारांविरोधात रान उठविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामात गाळप केलेल्या उसासाठी सुमारे 98 कोटी रुपये म्हणजेच जवळपास 1 अब्ज रुपये मिळणार आहेत. मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी प्रतिटन 100, तर त्यापेक्षा अधिक दर दिलेल्यांनी 50 रुपये देण्यावर एकमत झाले आहे. येत्या दोन महिन्यात साखर आयुक्तांची परवानगी घेऊन हे पैसे शेतकऱ्यांना द्यायचे आहेत.
‘श्री रेणुका- पंचगंगा’कडून इतिहासातील सर्वोच्च दर : पीएम पाटील
श्री रेणुका शुगर्स लिमिटेड, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या भाडेतत्त्वावरील युनिटने यंदाच्या 2023-24 च्या गळीत हंगामासाठी कोणतीही कपात न करता प्रति टन उसाला सर्वाधिक 3,300 रुपये भाव जाहीर केला आहे. हा दर राज्याच्या व साखर कारखान्याच्या इतिहासातील उच्चांक असल्याचा दावा कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील यांनी केला. अध्यक्ष पाटील म्हणाले की, कारखान्याने दरवर्षी जादा दर देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे.
सांगली : प्रतिटन ३१०० रुपये दर देण्याचा कारखानदारांचा निर्णय
सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी यंदाच्या हंगामात उसाला प्रतिटन 3 हजार 100 रुपये भाव देण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी ही माहिती दिली. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा निर्णय मान्य नाही, त्यामुळे संघटना आंदोलनाच्या मनस्थितीत आहे. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या पुढाकाराने कडेगाव येथे बैठक झाली. यावेळी उसाला प्रतिटन 3100 रुपये भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला खासदार संजय पाटील, क्रांती कारखान्याचे माजी अध्यक्ष, आमदार अरुण लाड, मानसिंगराव नाईक, पृथ्वीराज देशमुख, उदगिरी शुगरचे उत्तमराव पाटील, युवा नेते विशाल पाटील, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, ‘दत्त इंडिया’चे जितेंद्र धारू, हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी आदी उपस्थित होते.
सोलापूर : उसाला 2400 ते 2800 रुपये भाव
सोलापुरात यंदा उसाचा तुटवडा असल्याने जास्तीत जास्त भाव जाहीर करण्यासाठी साखर कारखानदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली असून त्यात मंगळवेढा तालुकाही मागे नाही. तालुक्यातील साखर कारखान्यांनी यापूर्वी जाहीर केलेले दर रद्द करून पुन्हा वाढवण्यास सुरुवात केली आहे. अवताडे शुगरने यापूर्वी उसाचा पहिला हप्ता २५५१ रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, इतर कारखान्यांनी जास्त दर जाहीर केल्याने अवताडे शुगरनेही पहिला हप्ता २७११ रुपये जाहीर केला आहे. दामाजी शुगरने 2511 रुपये, भैरवनाथ शुगरने 2725 रुपये तर युटोपियन शुगरने 2711 रुपये दर जाहीर केला आहे.
अहमदनगर : साखर कारखान्यांना एफआरपी जाहीर करण्याचे आदेश
दरवर्षीप्रमाणे यंदाही अहमदनगर विभागातील बहुतांश साखर कारखान्यांनी उसाचा भाव जाहीर करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. 22 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी अद्याप एफआरपी जाहीर केली नसल्याची बाब समोर आली आहे. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांना दोन दिवसांत एफआरपी जाहीर करण्याचे आदेश दिले.
राज्यातील गाळप हंगामाचे अपडेट
राज्यात 1 नोव्हेंबर 2023 पासून गळीत हंगाम सुरू झाला असून 23 नोव्हेंबर 2023 अखेर 116 लाख 93 हजार टन उसाचे गाळप झाले असून 89 लाख 56 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी 7.66 टक्के रिकवरी आहे. सध्या राज्यात 79 सहकारी आणि 82 खाजगी असे 161 कारखाने सुरु आहेत.