पाथर्डी : तालुक्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी कारखान्यांना ऊस तोडणी मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने ऊसाचे गाळप करणे अडचणीचे ठरत आहे. बहुतांश साखर कारखान्यांना उसाचा दररोजचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. वृद्धेश्वर साखर कारखान्याने आता मजुरांअभावी मशिनने ऊस तोडणी सुरू केली आहे. मजुरांअभावी हा पर्याय स्वीकारावा लागल्याचे कारखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
पाथर्डी तालुक्यात ऊस ऊस तोडणी मजुरांची संख्या कमालीची घटली आहे. शिवाय यंदा ऊसाच्या टंचाईची झळ कारखान्यांना बसली आहे. त्यापाठोपाठ ऊस तोडणी मजूर उपलब्ध होत नसल्याने कारखान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ऊस तोडणीचे काम कष्टाचे असल्याने आता बहुतांश लोकांनी शहरात खासगी कामे स्वीकारली आहेत. नवी पिढी नोकरी, व्यवसायात आहे. दुसरीकडे साखर कारखान्यांनी विस्तारीकरण केल्याने दैनंदिन गाळप क्षमता वाढली आहे. मात्र, या अडचणींमुळे हंगामाची उद्दिष्टपूर्ती ऐवजी दैनदिन गाळप क्षमता पूर्ण करणेही जिकिरीचे ठरत आहे. साखर उद्योगासमोर मजूर टंचाईचे संकट आहे. त्यामुळे शेतकरीही संकटात सापडले आहेत. कारखान्यांच्या शेती विभागाचे कर्मचारी, अधिकारी तोडणी मजूरांसाठी दाही दिशांना फिरताना दिसत आहेत.