धाराशिव : रांजणी (ता. कळंब, जि धाराशिव) येथील नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज लि, मध्ये गंधक आणि रसायनमुक्त साखर निर्मितीचा प्रारंभ करण्यात आला आहे. ‘पर्यावरण संतुलीत विकास आणि विषमुक्त अन्न’ हे ध्येय उराशी बाळगून २२ वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवलेल्या नॅचरल परिवाराने पर्यावरण संतुलित विकास यापूर्वी साधला आहे. मात्र, आता विषमुक्त अन्न ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यात नॅचरल परिवारास १०० टक्के यश मिळालेले आहे.
कारखान्यात चालू गळीत हंगामापासून १०० टक्के गंधक आणि इतर रसायनमुक्त (सल्फर आणि केमिकल फ्री) साखर निर्मितीस सुरूवात झालेली आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गंधक आणि केमिकल विरहित साखरेचे उत्पादन, सेवन केले जाते. साखर हा मानवी आहारातील अत्यावश्यक घटक असला तरी मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील बाब आहे. हवामान बदल, पर्यावरण असंतुलनाबरोबरच विषारी रसायनयुक्त अन्नधान्यामुळे मानवी जीवन धोक्यात आलेले आहे. त्यामुळे यासाठीचे प्रयत्न सुरू होते.
चालू गळीत हंगाम, २०२३-२४ पासून नॅचरल शुगरमध्ये साखर उत्पादन प्रक्रियेत गंधक व कोणत्याही घातक् रसायनाचा वापर न करता ऑरगॅनिक एन्झाईम्सचा वापर करून व यंत्र सामुग्रीमध्ये अत्याधुनीक बदल करून १०० टक्के गंधक विरहीत साखर उत्पादनाची सुरुवात झाली आहे. चालू हंगामासह यापुढे कायमस्वरुपी नॅचरल शुगर गंधक आणि रसायनमुक्त साखर निर्मितीमध्ये अग्रेसर राहील, अशी माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे.