कोल्हापूर : दक्षिण सोलापूर येथील लोकशक्ती शुगर्स हा साखर कारखाना अथर्व इंटरट्रेड ग्रुपने विकत घेतला आहे. या कारखान्याचा स्वतःचा को-जनरेशन प्रकल्प आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासह इथेनॉल प्रकल्पही लवकरच कार्यान्वित करणार आहोत. कारखाना कार्यक्षेत्रात थोडी डागडुजी आणि विस्तारित बांधकाम केले जाईल. त्यामुळे पुढील हंगामापासून गाळप सुरू केले जाईल, अशी माहिती उद्योजक मानसिंग खोराटे आणि पृथ्वीराज खोराटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्योजक खोराटे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील लोकशक्ती शुगर्स कारखाना विकत घेण्यासाठी स्पर्धेत आठ कंपन्या होत्या. आम्ही सर्वाधिक किमतीचे टेंडर आणि उत्तम व्यवस्थापनाचा अनुभव असल्याने यशस्वी ठरलो. कारखान्यामुळे परिसरातील २५ हजार शेतकरी कुटुंबाचा लाभ होईल. रोज ३,५०० गाळप क्षमता असणारा हा कारखाना आहे. ७२ एकर क्षेत्रावर कारखान्याचा प्रकल्प आहे. दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि कर्नाटक सीमा भागातील मोठ्या परिसराचे कार्यक्षेत्र समाविष्ट आहे. कार्यक्षेत्रात दोन नद्या असल्याने उसाचे क्षेत्र मुबलक प्रमाणात आहे.
उद्योजक खोराटे म्हणाले की, आमची कंपनी साखरेचे ट्रेडिंग अनेक वर्षांपासून देशभर करते. सद्यस्थितीत चंदगड येथील दौलत साखर कारखाना सक्षमपणे या ग्रुपच्या व्यवस्थापनाखाली सुरू आहे. कारखान्याचे व्यवस्थापन आमच्या कंपनीकडे आहे. आम्ही दौलतचा कारभार उत्तमपणे करीत आहोत. दौलत बेस्ट फाईव्हमध्ये असल्याचे प्रशासनाकडून यापूर्वी सांगण्यात आले आहे.